पिंपळे गुरव – काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलच्या बाजूला जे मोकळे मैदान आहे. या आरक्षित जागेवर पिंपळे गुरव परिसरातील नागरिक व व्यावसायिक आपली वाहने आणून पार्क करत आहेत. येथील अनधिकृत पार्किंगमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ही आरक्षित जागा मद्यपी, अवैध धंदे करणारे व अनधिकृतपणे वाहन पार्किंग करणारांचा अड्डा बनले आहे. यावर महापालिका प्रशासनाने निर्बंध घालावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपळे गुरव येथील या मैदानात जणू काही महापालिकेने ही जागा सर्वांना पार्किंगसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या सारखे सर्वजण येथे येऊन वाहने पार्क करत आहेत. पिंपळे गुरव येथील आरक्षण क्रमांक 344 मधील मोकळ्या असलेल्या जागेमध्ये भाडेकरूंचे कार पार्किंगचे ठिकाण झाले आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कार पार्किंग करण्यात येत आहे. येथील वाहनांच्या आड व रात्रीच्या वेळी मद्यपी येथे दारू पित बसलेले असतात.
मद्यपींचा वाढला त्रास
या मोकळ्या मैदानात अनधिकृत वाहन पार्किंगबरोबरच मद्यपींचा त्रास वाढला आहे. हे मद्यपी रात्री दारू पिऊन एकमेकांना शिव्या देतात. मोठ मोठ्याने गोंधळ घालतात. दारू पिणारे मित्र एकमेकांसोबत भांडणे करतात. हे मद्यपी भंडणामध्ये येथे उभा असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील मैदानात वाहन पार्किंग व मद्यपींना मज्जाव करणे गरजेचे आहे.
महापालिकेचा कानाडोळा
महापालिकेने आरक्षित जागेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ही जागा कंपाउंड करून सुरक्षित करणे गरजेचे आहे. परंतु या आरक्षित जागेकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने अनधिकृत पार्किंग अवैध धंदे व मद्यपींचा अड्डा येथे निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने येथील आरक्षित जाग संरक्षित करणे गरजेचे आहे.
या मोकळ्या मैदानात आजूबाजूला राहणारे नागरिक आपली वाहने आणून लावत आहेत. याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनधिकृत पार्किंग व मद्यपींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई केल्यास व मैदानाची जागा संरक्षित केल्यास येथील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
– कैलास बनसोडे, सामाजिक कार्यकर्ता.
आरक्षित मैदानात अनधिकृतपणे वाहने पार्क करण्यात येत असतील तर पाहणी करून असे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ही जागा आरक्षित आहे का हे देखील पाहू. असेल तर पालिका प्रशासनाला त्या ठिकाणी जागा संरक्षित करण्यासाठी सांगण्यात येईल.
– प्रसाद गोकुळे, वाहतूक विभाग.