लोणावळा – मॉन्सून सुरू अनेक दिवस झाले. परंतु मावळात व राज्यात म्हणावा असा पाऊस पडत नव्हता. परंतु सोमवार (दि. 17) पासून लोणावळा शहर आणि परिसरात पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरू आहे. मंगळवारी सकाळ ते बुधवारी सकाळपर्यंत 24 तासांत 220 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवार सकाळ ते बुधवार सकाळ या 48 तासांत एकूण 432 मिलिमीटर पाऊस लोणावळा शहरात पडला आहे. बुधवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. तर अधूनमधून जोरदार सरी येत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने मागे पडलेल्या पावसाने तो फरक आता भरून काढायला सुरुवात केली आहे. बुधवार (दि.19) सकाळ अखेर यावर्षीचा एकूण पाऊस 1744 मिलिमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी या वेळीपर्यंत 2592 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला होता. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण 50 टक्क्यांहून अधिक भरले आहे.
लोणावळा नगर परिषदेचे तुंगार्ली धरण साठवण क्षमतेएवढे भरले असून, अधिकचे पाणी टाटा कंपनीच्या वलवण धरणाकडे वाहू लागले आहे. रेल्वेचे भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, यातून लोणावळा धरणाकडे वाहणाऱ्या पाण्याचा लोट वाढला आहे.
लोणावळा परिसरात घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे घाटाखाली खोपोली परिसरातील पाताळगंगा नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली असून कर्जतमधून वाहणारी उल्हास नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे.