पुणे – पुणे लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान सुरु झाले आहे. यावेळी कॅण्टोमेंट विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचे नाव यादीत नसल्याने गोंधळ झाल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. याचा राग नागरिकांकडून प्रशासनावर काढण्यात येत होता. दरम्यान सकाळी अकरा पर्यत सहाही विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानांच्या टक्केवारीत कॅण्टोमेंटमधील टक्केवारी सर्वाधिक कमी असल्याचे दिसले. कॅण्टोमेंटमध्ये अकरा पर्यंत १३. ९४ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजेपर्यंत २३.२१ टक्के मतदान झाले होते. यापाठोपाठ सर्वात कमी मतदान शिवाजीनगर येथे २३.२६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कसबा पेठेत ३१.१० टक्के झाले.
कॅण्टोमेंट विधानसभा मतदार संघात लष्कर पोलीस ठाण्याअंतर्गत २८ बुथ येतात. यातील सादल बाबा चौकातील शाळेतील बुथवर मात्र सकाळपासूनच गर्दी होती. ही गर्दी दुपारपर्यंत टीकून येत होती. अल्पबचत भवन आणि घोरपडी परिसरात मात्र सकाळच्या टप्प्यात गर्दी कमी होती. यानंतर नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. मात्र प्रत्येक ठिकाणी मतदान यादीत नाव नसलेले नागरिक दिसत होते.
काही नागरिक तर तीन ते चार केंद्र फिरुन आल्यानंतरही त्यांना नाव सापडले नाही. यामुळे मतदानाशिवाय घरी परतावे लागले होते. याचा संताप मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. घोरपडी परिसरही कॅण्टोमेंट विधानसभा मतदार संघात येतो. येथे सकाळपासून शांततेत मतदान सुरु होते. मात्र मतदानासाठी गर्दी तुरळक होती. सकाळपर्यंत उत्साह कमी जाणवत होता.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ केंद्र आणि ७२ बुथ आहेत. यातील काही भाग कॅन्टोमेंट विधानसभा आणि हडपसर विधानसभा मतदार संघात येतो. मागील दोन दिवस परिसरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच सकाळपासून मतदान शांततेत सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.