पुणे – युवा खेळाडू मानुष शाह आणि अर्चना कामथ यांनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावताना पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाला 8-7 अशा फरकाने दबंग दिल्ली टीटीसीवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 ची ही अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
मानुषने पुरुष एकेरीत दमदार खेळ करताना जॉन पेर्सनवर 2-1 असा विजय मिळवून संघाला ड्रायव्हिंग सीटवर आणून बसवले. वडोदराच्या या युवा खेळाडूने पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये पेर्सनने चांगला खेळ करताना जबरदस्त पुनरागमन केले. त्याने हा गेम 11-8 असा जिंकला. मात्र, भारताच्या युवा खेळाडूने आपले सर्व कौशल्य पणाला लावताना तिसऱ्या गेममध्ये 11-4 अशी बाजी मारली.
दुसरीकडे अर्चनानेही अव्वल दर्जाचा खेळ करून 2-1 अशा फरकाने श्रीजा अकुलाचा पराभव केला. बंगळुरूच्या या खेळाडूने पहिल्या गेमपासून सामन्यावर पकड घेतली आणि 11-4 असा गेम जिंकला, पण दुसऱ्या गेममध्ये तिला 7-11 अशी हार मानावी लागली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. पुणेरी पलटनच्या खेळाडूने 11-6 असा हा गेम जिंकला. तत्पूर्वी, भारताचा स्टार खेळाडू साथियन ज्ञानसेकरन याला जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावरील ओमार असारकडून पराभव पत्करावा लागला.
साथियनने मागील सामन्यात जागतिक क्रमवारीत 58व्या क्रमांकावरील किरील गेरासिमेन्कोचा पराभव केला होता आणि त्याने आजच्या लढतीत सकारात्मक सुरुवात केली. त्याने परतीचे सुरेख फटके मारून प्रतिस्पर्धी ओमारला थक्क केले आणि पहिला गेम 11-6 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय खेळाडूने सर्व अनुभव पणाला लावताना ओमारला कडवी टक्कर दिली. ओमारला गेम जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यास साथियनने भाग पाडले. फोरहॅंड आणि बॅकहॅंडचा सुरेख खेळ या दोघांमध्ये पाहायला मिळाला, पण ओमारने हा गेम 11-8 असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये त्याने साथियनला संधीच दिली नाही आणि हाही गेम 11-4 असा जिंकला.
त्यानंतर, दबंग दिल्ली टीटीसीच्या बार्बोरा बालाझोव्हाने 2-1 अशा फरकाने पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाच्या हाना माटेलोव्हाचा पराभव केला. पहिल्या गेममध्ये स्लोव्हाकियन खेळाडूला हानाच्या आक्रमकतेसमोर टिकता आले नाही आणि हानाने हा गेम 11-2 असा जिंकला, पण बार्बोराने पुढील दोन गेममध्ये पुनरागमन करत बाजी मारली.
मिश्र दुहेरीच्या सामन्यात साथियन व बार्बोरा यांनी अप्रतिम खेळ करताना मानुष शाह व हाना यांच्यावर 2-1 असा विजय मिळवला आणि दबंग दिल्ली टीटीसीला या सामन्यात प्रथमच आघाडी मिळवून दिली होती. साथियन आणि बार्बोरा यांनी सकारात्मक सुरुवात केली, परंतु त्यांना गोल्डन पॉईंटने हा गेम गमवावा लागला, पण दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये त्यांनी पुनरामगमन करून 11-4, 11-7 असा विजय मिळवला.
निकाल
दबंग दिल्ली टीटीसी 7-8 पुणेरी पलटन टेबल टेनिस
साथियन ज्ञानसेकरन 1-2 ओमार असार (11-6, 8-11, 4-11)
बार्बोरा बालाझोव्हा 2-1 हाना माटेलोव्हा (2-11, 11-10, 11-10)
साथियन/बार्बोरा 2-1 मानुष शाह/हाना (10-11, 11-4, 11-7)
जॉन पेर्सन 1-2 मानुष शाह (10-11, 11-8, 4-11)
श्रीजा अकुला 1-2 अर्चना कामथ (4-11, 11-7, 6-11)