मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (मंगळवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राजधानी दिल्ली येथे होणार असलेल्या या भेटीमध्ये राज्यातील करोना परिस्थतीबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने शिवसेना पक्षातील सुत्रांकरवी दिलेल्या वृत्तानुसार, या भेटीदरम्यान मुख्यमंत्री राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतील असं सांगण्यात आलंय.
त्यामुळे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यादरम्यान नेमकी कोणती चर्चा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाबाबत एक पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी, ‘मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करण्यात यावे’ अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला अखेरचा संवाद झाला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी ठाकरे यांच्यासह अन्य चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना परिस्थितीबाबत चर्चा केली होती. अशातच मुख्यमंत्री ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने या भेटीदरम्यान काय चर्चा होते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.