सातारा – मुलीला वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी घेतलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील कांबळेश्वरनगर येथे घडली. मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जयेश भिसे असे मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या आई-वडिलांसह दुचाकीवरून जात होती. यावेळी बंधाऱ्याच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने मुलगी थेट बंधाऱ्यात पडली. ही घटना पाहताच जवळच असलेल्या चार तरूणांनी मुलीला वाचवण्यासाठी धरणात उडी घेतली. सुदैवाने मुलीचा जीव वाचला पण पाण्याच्या प्रवाहामुळे तरूणाचा बुडून मृत्यू झाला.
तरूणाला शोधण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम बोलावण्यात आली होती. टीमने जयेशला बंधाऱ्यातून शोधून काढले. मात्र, दुर्दैवाने त्याचा बुडून मृत्यू झाला होता. बंधाऱ्यात पडलेली मुलगी सुखरुप असून अन्य तीन युवकही ठिक आहेत. पण एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.