नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीत येण्याविषयी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर अप्रत्यक्षपणे धुडकावून लावली. उद्धव यांनी भाजप नेत्यांची चिंता करू नये, असे त्यांनी म्हटले.
भाजपने काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, गडकरींचे नाव नसल्याने भुवया उंचावल्या गेल्या.
त्यानंतर भाजपला घेरण्यासाठी उद्धव यांनी गडकरींना ऑफर दिली. त्यावर गडकरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. उद्धव यांचे वक्तव्य अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे.
महाराष्ट्रातील तिकीट वाटपावर भाजपमध्ये चर्चा होण्याआधीच ते वक्तव्य केले गेले. भाजपमध्ये उमेदवार निवडीची विशिष्ट प्रणाली आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ४०० जागांचा टप्पा ओलांडेल,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपने पहिल्या यादीत अनेक राज्यांमधील उमेदवारांचा समावेश केला. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा त्यामध्ये समावेश नव्हता.