नवी दिल्ली – शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह आणि नाव वापरण्याबाबत निवडणूक आयोगाची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, असे न्यायमूर्ती संजीव नरुला म्हणाले. निवडणूक आयोगाने शक्य तितक्या लवकर या समस्येवर निर्णय घ्यावा अशी सुचनाही दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे.
निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबरच्या अंतरिम आदेशात ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली होती.
शिवसेना पक्षाचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवणारा निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी ठाकरे यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.ठाकरे यांनी तोंडी सुनावणीची विनंती करूनही ठाकरे यांना सुनावणीची संधी न देता आयोगाने आदेश पारित करण्यात अवाजवी घाई केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.