Udayanidhi Stalin On PM Modi : तामिळनाडुत द्रमुकची झोप उडाली असून त्यांना निद्रानाश झाला आहे असे विधान पंतप्रधान मोदींनी तामिळनाडुतील सभेत केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना तामिळनाडूचे क्रीडा मंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदी आणि भाजपला घरी पाठवल्याशिवाय आम्हाला झोपच येणार नाही. पक्षाचे सर्व कार्यकर्ते तोपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
स्टालिन म्हणाले,”मोदी म्हणतात द्रमुक झोपू शकत नाही. होय, आम्ही तुम्हाला घरी पाठवत नाही तोपर्यंत आमची झोप उडाली आहे. आम्ही भाजप घरी जाईपर्यंत झोपणार नाही. २०१४ मध्ये गॅस सिलिंडर ४५० रुपयांचा होता आणि तो आता १२०० रूपयांवर गेला आहे.” | Udayanidhi Stalin on pm modi
निवडणूका आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नाटक केले आणि गॅसचे दर १०० रुपये कमी केले. निवडणुकीनंतर ते पुन्हा ५०० रुपयांनी सिलिंडरची किंमत वाढवतील, असे उदयनिधी यांनी तिरुवनमलाई जिल्ह्यातील प्रचार सभेला संबोधित करताना सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चक्रीवादळ मिचौंगच्या वेळी पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूला भेट दिली नव्हती परंतु निवडणुका जवळ आल्याने त्यांना तामिळनाडुची आठवण झाली आहे.
आमच्या मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला एक रुपयाही दिलेला नाही. येत्या २२ दिवसांत आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी व भाजपला घरी घालवण्यासाठी जनजागृती करतील असे ते म्हणाले. 3 जून रोजी दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांची १०० वी जयंती आहे आणि ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. आम्ही तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व 40 जागा जिंकून एक भेट देऊ,असे स्टॅलिन म्हणाले. | Udayanidhi Stalin on pm modi