नाशिक – अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पल्सर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सिन्नरजवळील महारामार्गावर घडली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. सचिन चकोर (वय 28, संजीवनीनगर, सिन्नर) आणि शिवम गिते (वय 18, ढोकेनगर, सिन्नर) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
सचिन आणि शिवम दोघे मित्र होते. ते पल्सर दुचाकीवरून मुसळगावाकडून सिन्नरकडे येत होते. यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. फरार वाहनचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.