जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 35 वर; 163 निगेटिव्ह, 108 संशयित विलगीकरण कक्षात, दोन करोनामुक
सातारा : कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील आणखी दोन महिला रुग्णांचा करोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 35 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या संशयितांपैकी 163 जणांचे रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आले. तर विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात 108 जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातून सोमवारी दोन रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून दाखल करण्यात आलेल्या 25 वर्षीय व 22 वर्षीय अशा दोन महिलांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कराडच्या रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या 25 झाली आहे. जिल्ह्यातील 36 करोनाग्रस्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे 28 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 47, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 9, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 63, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 44 अशा एकूण 163 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 7, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 44, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 43 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 14 अशा एकूण 108 जणांना संशयित म्हणून सोमवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.