भोपाळ: मध्य प्रदेशात सध्या रोज विशिष्ट दर्जाच्या 12 हजार पीपीई किटस्ची निर्मिती केली जात आहे. हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट किटस् करोना पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी वापरले जातात आणि त्याची देशात अत्यंत आवश्यकता आहे.
करोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यापासून मध्य प्रदेशात आतापर्यंत दीड लाख करोना किटस् तयार केले गेले आहेत. हे सर्व किटस् मध्य प्रदेशातच वापरले गेले आहेत. मध्य प्रदेशला रोज दहा हजार अशा किटस्ची गरज असते. जादाचे किटस् त्यांनी त्यांच्या गरजेसाठी राखून ठेवले आहेत. ही माहिती राज्याच्या औद्योगिक विकास केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक कुमार पुरषोत्तम यांनी दिली.
सध्या मध्य प्रदेशकडे चाळीस हजार किटस्चा साठा शिल्लक आहे. तो गरजेनुसार विविध जिल्ह्यांना पाठवला जात आहे. डीआरडीओच्या संमतीनेच मध्य प्रदेश सरकारने त्याचे उत्पादन सुरू केले असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.