पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर नऱ्हे भागात घडली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
हनुमंत बसप्पा कोळी (वय 45,रा. न्यू इंडिया शाळेजवळ, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस नाईक चेतन चव्हाण यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळी दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वाअकराच्या सुमारास दुचाकीवरून कात्रजकडून चांदणी चौकाकडे निघाले होते.
त्यावेळी स्वामी नारायण मंदिरासमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार कोळी यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या कोळी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडकर तपास करत आहेत.