जुन्नर तालुक्यातील पांगरी तर्फे मढ व कोळवाडीचा समावेश
आळेफाटा -माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर या कायद्याचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होताना दिसत आहे; मात्र या कायद्याचा योग्य वापर केल्यामुळे व माहिती अधिकारातून उघड झालेल्या चुकीमुळे जुन्नर तालुक्यातील कोळवाडी (आळे) व पांगरी तर्फे मढ या दोन गावांना तब्बल 27 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. याबाबत वडगाव आनंद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांनी पाठपुरावा केला.
प्रत्येक गावाचा, प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा या उदात्त उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून असणारा लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रफळ यांच्या तुलनेत द्यावा लागणारा निधी हा ग्रामपंचायत खात्यावर जमा करून खऱ्या अर्थाने प्रत्येक गाव विकास करण्याचे मोठे काम केले आहे. प्रत्येक गावास शासनाने स्वतंत्र असा निधी देत असताना गावची असणारी लोकसंख्या व गावचे असणारे भौगोलिक क्षेत्रफळ यावर आधारित अशी आकडेवारी तयार करून नंतरच असणारा निधी सन 2015-16 पासून वाटप केला जात आहे. हा निधी वाटप करत असताना आपल्या गावाला आलेला निधी लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्राप्रमाणे आला की नाही याची पडताळणीची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकाची आहे.
मौजे कोळवाडी (आळे) गावची सन 2011च्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्य ही 1665 आहे; परंतु 14व्या वित्त आयोगाचा अभ्यास करत असताना वडगाव आनंद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांच्या लक्षात आले की, कोळवाडी गावची लोकसंख्या 1665 असताना 849 धरण्यात आली आहे. त्यांनी ही बाब कोळवाडी गावचे सरपंच दिनेश महीपत सहाणे यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर डी. बी. वाळुंज व दिनेश सहाणे यांनी आपल्याच गावचे न पाहता 14 वित्त आयोगाच्या मोजमापाला पंचायत समिती जुन्नर व जिल्हा परिषद, पुणे या कार्यालयाने जी लोकसंख्या पकडण्यात आली आहे, त्याचा जनगणनेनुसार असणारी शासकीय लोकसंख्या यांचा मेळ ऑक्टोबर 2018 ला घालून तालुक्यातील विविध गावांचे झालेले नुकसान पंचायत समिती व जिल्हा परिषद, पुणे यांच्या निदर्शनास लेखी पत्राने आणून दिले.
ऑक्टोबर 2018पासून ते आजपर्यंत अनेक वेळा उप-मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, जिल्हा परिषद पुणे तसेच गाढवे व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जुन्नर यांच्या लक्षात आणून दिले. वेळोवेळी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून कोहिनकर, दांगट, श्रीमती बेनके व भुजबळ यांना भेटून शेवटी या चिकाटीचा फायदा म्हणून कोळवाडी(आळे) व पांगरी तर्फे मढ यांना हा निधही मिळणार आहे. कोळवाडी गावाला रक्कम रुपये 10 लाख 3 हजार 240 तर पांगरी तर्फे मढ या गावाला रक्कम रुपये 16 लाख 81 हजार 654 मिळणार आहेत. या रक्कमा वर्ग करण्याचा आदेश क्रमांक-पंस/पंचा-2/1268/2019 दिनांक 25/11/2019 रोजी ग्रामपंचायत गुंजाळवाडी (बेल्हे), नेतवड, वारूळवाडी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, व सोमतवाडी या ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे.
- या गावांना मिळालेला अतिरिक्त निधी
गुंजाळवाडी (बेल्हे), नेतवड, वारूळवाडी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, व सोमतवाडी या ग्रामपंचायतींना लोकसंख्या कमी असताना जास्त लोकसंख्येची नोंद झाल्याने अतिरिक्त निधी वितरीत झाला होता. त्यामुळे दांगट यांनी पडताळणी करून आदेश पारित केला आहे. ग्रामपंचायत कोळवाडी व पांगरी तर्फे मढ यांना या फरकाच्या रक्कमेतून निश्चित फायदा होऊन गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित!