हैदराबाद : तेलंगणातील 2 रोहिंग्यांना करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी समोर आले. त्यांनी मागील महिन्यात दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्या मेळाव्यातील अनेकांना करोनाची लागण झाली.
त्यापार्श्वभूमीवर, दिल्लीतील मेळाव्याला अनेक रोहिंग्या निर्वासितांनी हजेरी लावली होती. त्यामुळे रोहिंग्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचा आदेश नुकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिला होता. त्यानंतर मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या तेलंगणमधील 7 रोहिंग्यांची तपासणी करण्यात आली.
त्यातील दोघे करोनाबाधित आढळले. दरम्यान, तेलंगणमधील करोनाबाधितांची संख्या 872 वर पोहचली आहे. त्या राज्यात आतापर्यंत करोनाने 23 जणांचा बळी घेतला आहे. तर तेलंगणातील 186 रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.