‘धोकादायक मिळकती उतरवून घ्या’

पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या सूचना

पुणे – पावसाळा जवळ आल्याने धोकादायक मिळकती उतरवून घ्या, अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत. तशा नोटीसही आता धोकादायक मिळकतींना देण्याला सुरूवात करण्यात येणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील मोडकळीला आलेली घरे, गृहरचना संस्था, अन्य धोकादायक इमारती, सीमा तथा संरक्षक भिंतींलगत असलेली घरे, झोपड्या, लेबर कॅंप, डोंगरमाथा-उतारावरील घरे, नदी-नाल्यालगत असलेली घरे, झोपड्या, बांधकामांच्या ठिकणी खोदकामालगत असलेली लेबर कॅंप, तात्पुरते शेड यांना धोका उत्पन्न होऊ शकतो. अशा मिळकतींची तपासणी करून या इमारती उतरवून घेण्याच्या सूचनाही महापालिकेने केल्या आहेत.

आपण वास्तव्याला असलेल्या इमारती सुरक्षित राखण्याची जबाबदारी कायद्यानुसार मिळकतदार आणि वहिवाटदाराची आहे. त्यामुळे त्या मिळकतींमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याची किंवा मिळकतदाराने तेथे राहात असलेल्या व्यक्तींना स्थलांतरीत करण्याची खबरदारी घ्यावी, असेही सूचित केले आहे.

घरपाडी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग संपर्क क्रमांक
020-2501000
020-2506800

शहरात एकूण सुमारे अडीचशे मिळकती धोकादायक आहेत. त्यामध्ये जुने वाडे, काही जुन्या इमारती आहेत. त्यांना या आधीही वारंवार नोटीस बजावल्या आहेत. याशिवाय पूररेषेत असलेल्या अनधिकृत झोपड्या आणि अन्य शेड्‌सही धोकादायक क्षेत्रात येतात. त्यामुळे त्यांच्यासाठीही या सूचना आहेत. दरवर्षी महापालिका जानेवारी-फेब्रुवारीत अशा मिळकतींना नोटीस बजावते. मेमध्ये अशा इमारती उतरवून घेण्यासंबंधी सूचना करते, तरीही कोणी त्याची अंमलबजावणी केली नाही तर महापालिका स्वत: त्या उतरवते.
– राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.