पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रवाशांच्या सोयीसाठी कात्रज सर्पोद्यान ते विंझर या बसर्गाचा विस्तार करण्यात आला आहे. ही बस आता पाबेगांवपर्यंत जाईल, त्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे. दि. १४ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वेल्हे तालुक्यातून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. शाळा, महाविद्यालय, शेतकरी यासह व्यवसाय आणि नोकरी निमित्त नागरिक, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे शहरात येत असतात. नसरापूर, विंझर आणि पाबेगाव येथील नागरिकांची संख्या अधिक आहे. यासाठी कात्रज सर्पोद्यान ते विंझर बसमार्ग क्र. २९६ दररोज धावते. मात्र, ही बस विंझरपर्यंतच जाते, तेथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना अन्य वाहनांनी जावे लागते.
यामध्ये रात्रीच्यावेळी प्रवाशांची अधिक गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या मागणीनुसार मार्गाचा विस्तार करत ही बस आता पाबेगांवपर्यंत सेवा देणार आहे. कात्रज, खेडशिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, लाशीरगांव मार्गे पाबेफाटा, असा बसचा मार्ग असून तीन बस असणार आहे.
कात्रज सर्पोद्यान येथून बस सुटेल : सकाळी ०६:५०, ०८:२५, १०:२५, ११:४०, दुपारी १२:५५, १४:५५, १६:१५, संध्याकाळी ०५:४०, ०७:४०, ०९:१५.
पाबेफाटा येथून बस सुटेल : सकाळी ०५:५५, ०७:४०, ०८:५५, १०:३०, दुपारी १२:३५, ०१:५०, ०१:१०, संध्याकाळी ०५:००, ०६:२५, ०७:५०.