भाजप आमदाराची हत्या करणाऱ्या दोन नक्षलींचा खातमा

छत्तिसगढमधील चकमकीत पोलिसांची कामगिरी

रायपूर -छत्तिसगढमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांचा खातमा केला. मारले गेलेले नक्षली भाजप आमदाराच्या हत्येत सामील असल्याचा अंदाज आहे.

संबंधित चकमक छत्तिसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलात घडली. त्या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकावर नक्षलवाद्यांनी अचानकपणे गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात वर्गिस आणि लिंगा हे दोन नक्षलवादी मारले गेले. त्यांचा एक साथीदार चकमकीत जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, 9 एप्रिलला नक्षलवाद्यांनी भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवला. त्या स्फोटात मांडवी आणि त्यांचे चार सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडले होते. तो स्फोट घडवण्याच्या कटात वर्गिस आणि लिंगा सामील असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांचा खातमा हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.