कर्नाटकात आणखी दोन सत्ताधारी आमदारांचे राजीनामे; असं आहे सुधारित संख्याबळ

बेंगळुरू – कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार समोरील आव्हाने काही केल्या कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमधील आणखी दोन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून राजीनामा देणाऱ्या दोन आमदारांपैकी एक आमदार आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत.

गृहमंत्री एम टी बी नागराज आणि के सुधाकर अशी या राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे असून या दोन्ही आमदारांनी आज सायंकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत.

विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर एम टी बी नागराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, “मी राज्यातील राजकीय घडामोडींना कंटाळलो असून मला कोणत्याही मंत्रिपदाची अपेक्षा नाहीये. मला राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा आहे.” असं मत व्यक्त केलं.

दरम्यान, जेडीएस-काँग्रेस आघाडीतील आणखी दोन आमदारांनी आज आपला राजीनामा सादर केल्याने राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या १६वर पोहोचली आहे. सध्या २२४ संख्याबळ असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षांना वगळून सत्ताधारी जेडीएस (३७), काँग्रेस(७८) व बसपा (१) यांचे एकत्रित ११६ आमदार आहेत. जर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा सादर केलेल्या सर्व १६ आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ १००वर येईल. दुसरीकडे कर्नाटक विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचा पाठिंबा काढून घेत दोन अपक्ष आमदार सामील झाले आहेत. यामुळे आता भाजपचे संख्याबळ १०५वरून वाढत १०७ एवढं झालं आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठीचा जादुई आकडा गाठण्यासाठी ११३ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.