मंचर: आंबेगाव तालुक्यात बुधवारी (दि.२७) पुन्हा दोन पुरुष कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत . गांजवेवाडी (वळती) व गिरवली येथे असे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . मुंबई येथून आलेल्या गांजवेवाडी येथिल ५५ व गिरवली येथिल ५० वर्षीय वयोगटातील पुरुषांचा कोरोना वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुरेश ढेकळे यांनी दिली. तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन कोरोना बाधित आढळून आल्याने आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या एकूण दहा झाली आहे. गांजवेवाडी, गिरवली या दोन्ही गावांच्या सर्व सिमा सिल केल्या आहेत .
आंबेगाव तालुक्यात बुधवारी ( दि.२७ ) पुन्हा नव्याने दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . तालुक्याच्या पूर्व भागात जवळे, निरगुडसर या दोन गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता येथून जवळच असलेल्या गांजवेवाडी ( वळती ) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. दुसरा रुग्ण गिरवली येथे आढळून आला. या दोन्ही व्यक्ती मुंबईवरून आलेल्या आहेत. गांजवेवाडी येथिल व्यक्ती सात दिवसांपूर्वी मुंबईवरून आली होती . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीची तब्ब्येत बिघडली. त्यानंतर त्याचा वैद्यकीय अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला.
प्रशासनाने सदर व्यक्तींना तपासणीसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या घटनेने गांजवेवाडी (वळती) परिसरात खळबळ उडाली आहे.
तहसिलदार रमा जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुरेश ढेकळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे , पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप पवार यांनी तत्परतेने संबंधित गावांना भेटी दिल्या. यावेळी शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, सरपंच रुबीना मुलाणी, कामगार तलाठी राजेश उमाळे, ग्रामसेवक एस .एस. खोल्लम, अर्जुन भोर, बाळासाहेब बोऱ्हाडे, गोविंद गांजवे,पोलिस पाटील प्रकाश लोंढे पाटील , आशा वर्कर आदी उपस्थित होते