अकलूज (प्रतिनिधी) – संग्रामनगर हद्दीतील दोन जणांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी दिली. या दोन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठावण्यात आले आहेत. करोना पॉझिटिव्ह रुग्ण हे होलसेल किराणा व्यापारी असल्याने संपर्क लिस्ट वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. 12 दिवसांपूर्वी त्याच्या संपर्कात अकलूज (ता. माळशिरस) येथील संग्रामनगरमधील दोघेजण आले होते, ही माहिती मिळताच प्रशासनाने त्या दोघांना दोन दिवसांपूवी होम क्वारंटाइन करून त्यांचा अहवाल तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवला होता. बुधवारी (दि. 27) सकाळी या दोन्ही व्यक्तींचा आहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नऊ जणांना अकलूज परिसरातच क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचे तपासणी अहवालही सोलापूर येथे पाठवण्यात आले आहेत.
हे रुग्ण ज्या परिसरात सापडले आहेत, त्याच्या आजुबाजूचा तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्याच्या कामाला प्रशासन लागले आहे. लॉकडाऊननंतर गेल्या आठ दिवसांपासून अकलूज पूर्वपदावर येऊ पाहात होते. मात्र, आता शहरात दोन रुग्ण सापडल्याने अकलूज शहर व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.
अकलूज, संग्रामनगर व बागेवाडी गावांच्या हद्दीतील परिसर सील करण्यात येणार आसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे, तर आज दुपारपासूनच अकलून आणि संग्रामनगर परिसरातील सर्व दुकाने बंद होण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता घरी राहण्याचे आहवान प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले आहे.