पिंपरी – महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहत. यापूर्वी बनावट एफडीआर प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
फसवणुकीच्या पहिल्या गुन्ह्यात मे. संजीवन प्रिसीजनचे प्रो. संजीव यशंवत चिटणीस (वय 65, रा. बिबेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रविण विठ्ठल लडकत यांनी शुक्रवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 7 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत घडली. चिटणीस याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाच्या कामाची निवीदा भरली. त्यासाठी पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभागातील पर्वती जल शुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन साठवणुकीसाठी शेड उभारणे, दहा किलो/ तास क्षमतेचे क्लोरिनेटर्स उभारणे या कामाचा कार्यकारी अभियांताकडील 29 नोव्हेंबर 2018 बनावट दाखल सादर केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात मे. राजेश इंजिनिअर्स ऍन्ड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाडगे (वय 69, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी रामनाथ निवृत्ती टकले (वय 55, रा. रावेत, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 24 मार्च 2019 रोजी घडली. आरोपी घाडगे याने हिंदूस्थान ऍन्टीबायोटिक्स लिमिटेड या शासकीय संस्थेचे खोटे अनुभवाचे प्रमाणपत्र तयार करून ते पिंपरी चिंचवड महापालिकेला सादर केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे एक कोटी दोन लाख 91 हजार 982 रुपयांचे निविदेद्वारे काम मिळवत महापालिकेची फसवणूक केली.