- आयुक्तांच्या बैठकीत खासगी शाळांना आदेश
पिंपरी – खासगी शाळांच्या फी वाढीविषयक आलेल्या तक्रारीसंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांनी शनिवारी (दि.3) शाळांचे संस्थापक व मुख्याध्यापक यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी 15 टक्के फी कपात आणि आरटीई प्रवेश देण्याचा आदेश आयुक्त पाटील यांनी शाळांना दिला आहे.
यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुन्हा शाळांकडून फीचा तगादा लावणे व प्रवेश नाकारणे, ऑनलाइन शिक्षण बंद करणे, दाखला काढून देणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागात येत आहेत. आरटीई अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारल्याचेही समोर आले होते. त्यामुळे पालक शिक्षण विभागात गर्दी करतात. शिक्षण विभागाने नोटीस बजावूनही शाळा दाद देत नाहीत. यावर तोडगा म्हणून आयुक्तांनी शहरातील सर्व शाळा चालकांची बैठक घेतली
या बैठकीत शाळांनी 15 टक्के फी मध्ये कपात करावी. तसेच आरटीईचा परताव्यासाठी शाळांनी आरटीई प्रवेश रखडवू नये. शासनाकडून आरटीईचा परतावा मिळाला आहे. उर्वरित थकबाकी आज ना उद्या मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करु नये, अशा सूचना दिल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, करोनाने पालकांचा मृत्यू झाल्याने काही मुले अनाथ झाली आहेत. अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्यासाठी खासगी शाळांनी पुढाकार घ्यावा. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जनजागृती करण्यासाठी अचूक आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. काही व्यक्ती शाळेला हेतुपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कृत्य करत असतील तर अशा वेळी महापालिका प्रशासनाचे सहकार्य शाळा व्यवस्थापनाला असेल. पिंपरी चिंचवड शहराचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले.