जम्मू – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दोन अल्पवयीन भगिनी आज प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात येऊन दाखल झाल्या आहेत. या दोन्ही भगिनींना आज सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघींनी अनावधानाने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्याचे प्राथमिक चौकशीतून आढळले आहे.
लैला झाबाइर (17) आणि तिची धाकटी बहीण सना झबाइर (13) अशी या दोघींची नावे असून दोघीही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील कहुता तालुक्यातील अब्बासपूर गावच्या रहिवासी आहेत.
या दोघी “एलएसी’ ओलांडून भारतीय हद्दीमध्ये भटकल्या असल्याचे पूंछ विभागात गस्तीवर असलेल्या भारतीय सुरक्षा दलांच्या लक्षात आले, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
या भगिनींना कोणतीही इजा होऊ नये यासाठी त्यांची काळजी घेण्यात येत असून त्यांना लवकरात लवकर परत पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही या प्रवक्त्याने सांगितले.