शिक्रापूर (प्रतिनिधी) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बॅटरी व इन्व्हर्रटरची कंपनी लॉकडाऊनमध्ये बंद केलेली असताना कंपनीतील सुमारे दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव येथे विकास शितोळे यांच्या मालकीची सीएसएस इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून तेथे बॅटरी व इन्व्हर्रटर निर्मिती केली जाते. 15 मार्च रोजी शितोळे हे कंपनीतील कामे उरकून सायंकाळी कंपनी बंद करून घरी गेले. नंतर लॉकडाऊन झाल्यामुळे शितोळे यांनी कंपनी उघडली नाही. त्यानंतर 12 मे रोजी शितोळे हे कंपनी उघडून कंपनीमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये ठेवलेले काही बॅटरी, इन्व्हर्रटर, बॅटरी प्लेट, सिलिंडर, कॉम्प्यूटर हे साहित्य दिसून आले नाही.
यावेळी शितोळे यांनी आजूबाजूला पाहणी केली असता त्यांना आतमध्ये साहित्य दिसले नाही व कंपनीमध्ये चोरी झाल्याची खात्री झाली, याबाबत विकास संपतराव शितोळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहेत.