शिरूर – रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील 50 वर्षीय एक कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. हा कर्मचारी पुण्यात राहत आहे. थिटेवाडी केंदूर येथील 60 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
वडगाव शेरी येथून हा कामगार रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला येत आहे. या कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. थिटेवाडी येथील एका कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णाचे मुले मुंबईवरून थिटेवाडी येथे आले होते. त्यामुळे वृद्धाला बाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. वृद्धास त्रास होत असल्याने त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची करोनाची तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.
गणेगाव, दहिवडीचे दोघे घरी परतले
रांजणगाव गणपती -गणेगाव खालसा व दहिवडी (ता. शिरुर) येथील पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन घरी सोडल्याची माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार यांनी दिली. गणेगाव खालसा येथे मुंबईहून आलेला एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दहिवडी येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना घरी सोडले आहेत.
नऊजण विलगीकरणात
केंदूर- थिटेवाडीमधील बाधित वास्तव्यास असलेला परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. कुटुंबातील सदस्यांसह नऊ जणांना शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले आहे. नऊजणांचे गुरूवार (दि.10) चाचणीसाठी नमुने घेण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामसेवक छाया साकोरे यांनी दिली. पाबळच्या एका खासगी रुग्णालयात रुग्णाने उपचार घेतल्याने डॉक्टराला घरीच विलगीकरण कक्षात रहाण्यास सांगितले आहे. जार विक्रेता, दुग्ध व्यावसायिक, रुग्णवाहिका चालकास विलगीकरण कक्षात राहण्याची सूचना केली आहे.