पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून दुबईसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू असून, शनिवारी (दि. 10) रात्री पुण्यातून दुबईकडे उड्डाण करण्याअधीच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना दीड तास विमानामध्ये ताटकळत बसून रहावे लागले.
पुणे-दुबई विमान रात्री आठ वाजता सुटणार होते. त्याच्या अगोदर विमानामध्ये साधारण १८० प्रवासी बसले होते. नऊ वाजता विमानात कॅप्टन आले आणि त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगितले. त्यानंतर दुरुस्तीसाठी विमान बाजूला घेऊन गेले. पण, प्रवाशांना विमानातून उतरविले नाही. विमान दुबईसाठी कधी उड्डाण करणार, हे प्रवाशांना सांगितले जात नव्हते.
रात्री आठचे विमान पावणेदहा वाजले, तरी सुटलेले नव्हते. याबाबत दुबईला पर्यटनासाठी निघालेले क्षीरसागर आणि पंडीतराव कुटुंबीयांनी विमान कंपनीच्या त्रासाबद्दल सांगितले. विमान कंपनीचे कर्माचारी विमान कधी सुटेल हे सांगत नसल्यामुळे प्रवाशांना विमानामध्येच ताटकळ थांबावे लागत आहे. तसेच, पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोणत्याही सुविधा नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.