पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
ओतूर – पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने दरोडा, अपहरण, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोन जणांना ओतूर हद्दीतून सापळा रचून अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी दिली.
सचिन सखाराम मेंटागळे (रा. बोरी, ता. जुन्नर) आणि निवृत्ती तबाजी कुटे (रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) यांना गुरुवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास आळेफाटा (ता. जुन्नर) येथून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. सचिन सखाराम मेंटागळे व निवृत्ती तबाजी कुटे यांच्यावर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये फेबुवारी 2019 ला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात 8 आरोपी होते, त्यापैकी 4 जणांना अटक केली होती आणि चार जण फरार होते. फरार चार जणांमधील सचिन मेंटागळे व निवृत्ती कुटे हे दोघे आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये गस्त करीत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल किरण कुसाळकर यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून ओतूर पोलीस स्टेशनला दरोडा, हत्येसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेले सचिन मेंटागळे आणि निवृत्ती कुटे हे दोघेजण आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, राजू पवार, किरण कुसाळकर, मोसिन शेख, महेंद्र कोरवी व विशाल बोरुडे या पथकाने कारवाई केली.