राजगुरूनगर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
राजगुरूनगर – खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 19) फेटाळला असल्याने मोहितेंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मोहिते सध्या कोठे आहेत कोणला माहित नसले तरी ते उच्च न्यायलयाचा दरवाजा ठोठवणार की स्वत:हून पोलिसांसमोर हजर होणार हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. 18) राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांच्या न्यायालयासमोर मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी तर सरकारी पक्षाकडून ऍड. अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे न्यायाधीश अंबळकर यांनी ऐकून घेत शुक्रवारी (दि. 19) निर्णय देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार अंबळकर यांनी आज निर्णय देत मोहिते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
चाकण येथे मोहिते यांचे भाषण झाले होते. त्यानंतर ते पुण्याला बॅंकेच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी नागरिकांना भडकविले तर नाहीच, उलट शांततेचे आवाहन केले होते. पोलिसांनीच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोहितेंबाबत काहीही उल्लेख नाही. त्यानंतर 83 आरोपी अटक केले त्यांच्या जबाबामध्ये मोहितेंचा उल्लेख नाही. अचानक एक वर्षांनंतर मोहिते आरोपी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यावर कटकारस्थान केल्याचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी करण्यात आले आहे, असा युक्तिवाद दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी केले होते.
तर चाकणच्या हिंसाचाराच्या घटनेआधी काही दिवस हे कटकारस्थान करण्यासाठी, एक गुप्त बैठक झाली. तिथे मोहिते होते. तसे काही साक्षीदारांचे जबाब आहेत, पण त्यांची नावे आता उघड करता येणार नाहीत. त्या जबाबांवरून आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होत आहे, म्हणून त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकील अरूण ढमाले यांनी केला. त्यामुळे त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
न्यायाधीशांच्या निकालपत्रात नमूद की….
या प्रकरणाच्या या स्तरावर मोहिते यांच्या भाषणाच्या प्रत्येक वाक्याचे मूल्यमापन कोणी करू शकत नाही. नेमका त्याच वेळी अनियंत्रित जमावाकडून झालेला हिंसाचार आणि पोलिसांना झालेल्या गंभीर जखमा, मालमत्तेचे 8 ते 10 कोटींचे नुकसान याचा विचार करावा लागेल. तसेच तपासणी अहवालानुसार आधीच रॉकेल आणि शस्त्रे घेऊन आलेले लोक, काही साक्षीदारांचे जबाब आणि भा. दं. वि. कलम 120-ब चा विचार करता मोहिते यांना अटकपूर्व जामीनाचा अधिकार नसल्याचे आपले मत झाल्याने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत आहे, असे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
दिलीप मोहितेंची व्हिडीओ क्लिप माध्यमांसमोर
चाकण येथे 31 जुलै 2018 रोजी मराठा आंदोलनस हिंसक वळण लागले होते. हे आंदोलन हिंसक होण्यामागे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हात असल्याचा ठपका ठेवत बुधवारी (दि. 10) त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते मात्र, ते त्याठिकाणी मिळून आले नाही. त्यानंतर ते आजपर्यंत कोठे आहेत याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र, शुक्रवारी (दि. 19) सकाळी अचानक प्रसारमाध्यमांकडे त्यांची व्हिडीओ क्लिप आली. आपणास राजकीय षड्यंत्राणातून या गुन्ह्यात गोवले असून माझा याच्याशी काही संबंध नसल्याचे त्यांनी या “क्लिप’द्वारे स्पष्ट केले आहे.