नवी दिल्ली – समाज माध्यमांची विश्वासार्हता अनेकदा धोक्यात येत असताना, आजही अनेक समाजमाध्यमे चुकीची माहिती सरसहा प्रसिद्ध करताना दिसत आहेत. अशीच एक आगळीक ट्वीटर या समाज माध्यमाने केली असून केंद्र सरकारच्या सज्जड इशाऱ्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य करत दुरुस्तीही घडवून आणली आहे.
भारताच्या नकाशाला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी केंद्र सरकारने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला समज दिली आहे. ट्विटरने लेहच्या भागाला चीनचा भाग दाखवले होते. यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांनी ट्विटरला पत्र लिहून, भारताच्या अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा अपमान करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा ट्विटरवर प्रकाशित नकाशामध्ये लेहची जिओ-लोकेशन चीनमध्ये दाखवण्यात आले. यानंतर, भारत सरकारकडून ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सेला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, लेह, लडाख क्षेत्राचे हेडक्वार्टर आहे. भारतीय संविधानानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत. ट्विटरच्या निष्पक्षपणाबद्दल आणि तत्त्वांबद्दल पत्रात प्रश्न उपस्थित करण्यात आले.
केंद्र सरकारच्या पत्रानंतर ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ट्विटर भारत सरकारबरोबर काम करण्यास वचनबद्ध आहे. तसेच, भारताच्या भावनांचा आदर करतो. आम्ही त्वरेने चुकीची दुरुस्ती करत असून झाल्या चुकीबद्दल क्षमायचनाही करतो, अशी क्षमायचनाही त्यांनी केली आहे.