सातारा, (प्रतिनिधी) – येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज करंडक दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामने उद्या (शुक्रवार), दि. 23 रोजी सायंकाळी होणार आहेत. अंतिम सामना संपल्यावर, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. त्यावेळी खासदार उदयनराजेंचा वाढदिवस, क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने देण्यात आली.
खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या 17-18 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेली प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज करंडक दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली आहे. या स्पर्धेची महाराष्ट्रातील नावाजलेले क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिक आतुरतेने वाट पहात असतात.
यंदाच्या वर्षी या स्पर्धेत तब्बल 92 संघांनी सहभाग नोंदवला असून, उपांत्यपूर्व फेरीचे सामने गुरुवारी झाले. शुक्रवारी होणार्या उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामन्यांची क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाख 11 हजार 111 रुपये रोख आणि दादामहाराज करंडक आणि उपविजेत्या संघाला 66 हजार 666 रोख आणि करंडक, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीत धडक मारलेल्या दोन संघांना प्रत्येकी 22 हजार 222 रुपयांची प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामन्यांचा आनंद क्रिकेटप्रेमींनी घ्यावा. अंतिम सामना संपल्यानंतर होणार्या बक्षीस वितरण समारंभास आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्रिकेटप्रेमी आि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्यावतीने अमोल पाटुकले यांनी केले आहे.