तुर्कस्तानच्या कांद्याने व्यापाऱ्यांचा केला वांदा

महाळुंगे इंगळे -देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. चाकण सारख्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या भागात सध्या तुर्कस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.

मात्र, या कांद्याला अजिबात खरेदीदार मिळत नसल्याने तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा अशीच काहीशी स्थिती चाकण मार्केटमध्ये पहावयास मिळत आहे. 50 ते 60 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा 15 ते 20 रुपये किलो दराने देखील विक्री होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने व कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा, म्हणून एक लाख मेट्रीक टनपेक्षा अधिक कांदा तुर्कस्तान व इजिप्तमधून आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. परदेशातून आयात केलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वी इजिप्तचा कांदा चाकण बाजारात दाखल झाला होता.

आता तुर्कस्तानचा कांदा चाकण मार्केटमध्ये विविध व्यापाऱ्यांकडे कंटेनर भरून दाखल होत आहे. मात्र, या कांद्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवली आहे. चवीला अत्यंत सुमार दर्जाचा असलेला तुर्कस्तानचा कांदा हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य नागरिक खरेदी करण्यास तयार नाहीत..गावरान कांद्याच्या तुलनेत या तुर्कस्तानच्या कांद्याला अजिबात चव नसल्याचे नागरिक आणि खुद्द कांदा व्यापारी सांगत आहेत.

त्यामुळे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी 50 ते 60 रुपये किलोने खरेदी केलेला हा तुर्कस्तानचा कांदा 10 ते 15 रुपये किलो दराने चाकणमध्ये विक्री करावा लागत असून, त्यालाही ग्राहक नसल्याची स्थिती समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here