पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना झिरो शॅडो डे अर्थात आपलीच सावली आपल्यला सोडून गेल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क येथे दुपारी 12.31 वाजता ‘झिरो शॅडो डे’ या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेकजण जमले होते. त्यांनी दुपारी १२.३१ वाजता आपलीच सावली गायब झाल्याचा अनुभव घेतला.
शून्य सावली दिवस अर्थात झिरो शॅडो डेचा अनुभव वर्षापून दोन वेळेला घेता येतो. या वर्षी तो मंगळवारी (दि. १४) पिंपरी-चिंचवड, देहू, लोणावळा, तळेगाव दाभाडे येथे नागरिकांना अनुभवता आला. ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियानुसार, ही वार्षिक खगोलीय घटना वर्षातून दोनदा +23.5 आणि -23.5 अंश अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी घडते.
पिंपरी-चिंचवडमध्ये ही मंगळवारी घटना अनुभवता आली. शहरातील रहिवाशांनी सायन्स पार्क येथे दुपारी 12.31 वाजता ‘झिरो शॅडो डे’ या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी केली होती व आपलीच सावली आपली साथ सोडून गेल्याची प्रचिती त्यांनी घेतली.
आज शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा काहींना अनुभव घेता आला नाही. मात्र, काही ठिकाणी आकाश निरभ्र होते, परिणामी शून्य सावलीचा अनुभव नागरिकांंना घेता आला. तर, महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत ठिकठिकाणी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे.