खालापूर, (वार्ताहर) – कलोते फाट्यावरील हॉटेल मालक भानुदास भीवा चौधरी यांच्याशी हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ११) घडली. तर, खालापूर पोलिसांची २४ तासांच्या आत आरोपीला गजाआड केले आहे. संशयित नितेश पाटील व त्याचा सहकारी मारुफ उर्फ मेहबूब हसमत अली (मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कलोते) यांना अटक केली असून गुरुवारपर्यंत (दि. १६) पोलीस कोठडी सुनवली आहे.
मिळालेली माहिती अशी की, भानुदास भीवा चौधरी (वय 54 वर्षे, रा.कलोते, ता. खालापूर) यांचा वडापाव – चहा विक्रीचा कलोते फाटा येथे हॉटेल व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. १०) ते त्यांची पत्नी व मुलला रात्री 9 च्या सुमारास हॉटेल बंद करुन घरी जाण्यास सांगितले व ते हॉटेलमध्येच झोपले. दुस-या दिवशी सकाळी मृत भानुदास यांची पत्नी, मुलगा हॉटेल उघडण्यास आले असता भानुदास हे हॉटेलमध्ये दिसून आले नाही.
त्यांनी शोध घेतला असता हॉटेलच्या पाठीमागे साधारण 100 मीटर अंतरावर उंबराच्या झाडाजवळ ते मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे हे पोलीस ठाणेकडील पथकासह घटनास्थळी पोहचले.
मृताच्या हातावर, गळ्यावर झालेल्या जखमा होत्या. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपास केला असता संशयित नितेश पाटील याने त्याचा सहकारी मारुफ उर्फ मेहबूब हसमत अली याच्या सहाय्याने भानुदास चौधरी यांचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली.