मुंबई – राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. यावरुन सत्तेत असलेला कॉंग्रेस पक्ष नाराज आहे. पदोन्नतीत आरक्षणाबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. यानंतर नाराज असलेले मंत्री नितीन राऊतांसह कॉंग्रेस महत्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
पदोन्नतीच्या मुद्यावर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत आज कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत चर्चा करून घेणार निर्णय होणार आहे.
दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर नितीन राऊत माध्यमांशी न बोलताच निघून गेले.
पदोन्नतील आरक्षण या विषयावर कॅबिनेट बैठकीत आज चर्चा झाली. या विषयावर आता समन्वय समितीत चर्चा होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या विषयांवर समन्वय समितीत चर्चा होते. या समितीत तिन्ही पक्षातील प्रमुख मंत्री आहेत. या समितीत कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील शिवसेनेकडून सुभाष देसाई,अनिल परब आहेत.
दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कॉंग्रेसचा विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावरून पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.