पारनेर – पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे तरस प्रजातीच्या वन्यजीवाची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उघडकीस आला असून वनविभागाने कारवाई करीत तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त करून एकास अटक केली आहे. मात्र एक जण फरार असल्याचे समजते.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कान्हूरपठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असून त्याला खाण्याची तयारी असल्याची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर या ठिकाणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी तरस जातीच्या वन्यजीवांचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली.
मृत तरसच्या अवयवांचा पंचनामा करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ओव्हळ यांनी दिली. कान्हूरपठार येथील सुरेश दत्तू शिंदे यास अटक केली. साथीदार विरोली मधील असल्याची प्राथमिक माहिती असून सुरेश शिंदे विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.