नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांचा प्रचार तापू लागला आहे. अशात कॉंग्रेसने गुरुवारी चंडिगढमधील पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित केला. सिंग यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसकडून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचाही तशाच प्रकारचा संदेश जारी केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्या संदेशांमुळे कॉंग्रेसच्या प्रचाराला बूस्टर मिळणार का, याची उत्सुकता आहे.
देशातील राजकारण पाच विधानसभा निवडणुकांमुळे घुसळून निघाले आहे. पाचपैकी गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांतील मतदानाची प्रक्रिया याआधीच उरकली आहे. आता पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होईल. उत्तर प्रदेशात सातपैकी पाच टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे, तर मणिपूरमधील दोन्ही टप्प्यांसाठीचे मतदान अजून व्हायचे आहे.
संबंधित राज्यांतील प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवले. भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख राष्ट्रीय पक्षही त्याला अपवाद नाहीत. भाजपच्या प्रचाराची भिस्त अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. त्या पक्षाचे बहुतांश केंद्रीय मंत्रीही प्रचारात सहभागी झाले आहेत.
कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. मात्र, त्या पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या खांद्यावरच पडलेली दिसते. त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या याद्यांमध्ये मनमोहन सिंग आणि सोनियांचाही समावेश आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव ते प्रचारात प्रत्यक्षपणे सहभागी झालेले नाहीत. आता पंजाबमधील प्रचार संपत आलेला असतानाच कॉंग्रेसने सिंग यांचा व्हिडिओ संदेश जारी केला. त्या संदेशातून सिंग यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
भाजपचे नेते प्रचारावेळी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरू यांनाही लक्ष्य करत आहेत. तो धागा पकडून सिंग यांनी मोदी सरकारला प्रत्युत्तर दिले. मोदी सरकार साडेसात वर्षांपासून सत्तेवर आहे. आपल्या चुका मान्य करण्याऐवजी ते सरकार अजूनही नेहरूंनाच दोष देत आहे, असा शाब्दिक हल्लाबोल सिंग यांनी केला. ती भूमिका भाजपची काही प्रमाणात का होईना कोंडी करू शकेल. आता प्रामुख्याने उत्तर प्रदेश निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सोनियाही भूमिका मांडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रचाराला बळकटी मिळू शकेल.