पिंपरी – कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (25 सप्टेंबर) आयोजित केली होती. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी शहराची करोना परिस्थितीची माहिती या वेळी दिली. करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माई ढोरे यांना करोनासंबंधी काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कसे नियोजन केले आहे यासंबंधी विचारणा केली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरासंबंधी माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून कोविड-19 संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या तुटवड्याकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. शहरात सध्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू आहे. या अंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरांना भेटी देत असून, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचेही महापौरांनी या वेळी सांगितले.
अखेर महापौरांची उपस्थिती
पुण्यात होणाऱ्या कोविड आढावा बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या महापौर अनुपस्थित रहात असल्याबाबत दैनिक “प्रभात’ने गुरुवारी (दि. 17) वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापौरांनी बैठकीला हजेरी लावत शहरातील परिस्थितीचा आढावा बैठकीत दिला. त्यामुळे शहरातून लोकप्रतिनिधी या बैठकांना हजेरी लावू लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.