सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका

भारतीय संघ निवड समितीवर सौरभ गांगुलीची टीका

नवी दिल्ली: विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील अपयशाला मागे टाकून भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्‌वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीन वेगवेगळे संघ जाहीर केले. या दौऱ्यासाठी वन डे संघात शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज अजिंक्‍य रहाणे याला संधी न मिळाल्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीने आश्‍चर्य व्यक्त केले. 3 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याशिवाय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला आपली छाप पाडण्याची संधी आहे.

अजिंक्‍य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार आहे, परंतु तो वन डे संघात असायला हवा होता. शिवाय भारत अ संघाच्या विंडीज दौऱ्यात शुबमनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यालाही वन डे संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत गांगुलीने व्यक्त केले. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या गांगुलीने यावेळी निवड समितीवर ताशेरे ओढले. त्याने सांगितले की,”तीनही प्रकारच्या संघात समान खेळाडू निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्य राखण्यात मदत होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. सध्याच्या घडीला मोजकेच खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्न करू नका, देशासाठी चांगले खेळाडू निवडा.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)