विजेसाठी नागरिकांचा उपअभियंत्यास घेराव

जामखेड शहरातील महादेव मंदिर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा ः महावितरणचा अनागोंदी कारभार उघड

जामखेड – तपनेश्वर भागातील महादेव मंदिर परिसरातील नागरिकांना गेल्या एक वर्षापासून अत्यंत कमी दाबाने व खंडीत वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि.22) रात्री 10 वाजता महावितरणचे कार्यालय गाठले. तसेच उपअभियंता योगेश कासलीवाल यांना घेराव घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान कासलीवाल यांनी रात्री मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच ही समस्या आगामी आठ दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे जमाव शांत झाला.

येथील महादेव मंदिर परिसरात एकाच वीज रोहित्र असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर दाब येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे विद्युत मोटारी व इतर विद्युत उपकरणे चालत नव्हती. त्याचबरोबर परिसरामध्ये विजेवर चालणारे लघुउद्योग ही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर होती. विजेची उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत नागरिकांकडून वारंवार निवेदने देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे होत होती. मात्र दरवेळी तात्पुरती व्यवस्था करून देण्यात येत असल्याने काही दिवसांनी पुन्हा तोच प्रश्‍न उपसथित होत होता.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्‍न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास थेट महावितरण कार्यालयावर धडक घेऊन उपअभियंता कासलीवाल यांनाच घेराव घातला. तसेच आपल्या समस्या मांडल्या. या परिसरात महावितरणने गेल्या वर्षी नवीन रोहित्र बसविण्यासाठी सांगाडा उभारला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत त्यावर रोहित्र बसविण्यात आले नाही. या परिसरातील अनेक घरांना त्यामुळे विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. यावेळी उपअभियंता कासलीवाल यांना नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली. कासलीवाल यांनी या भागास भेट देऊन येत्या आठ दिवसांमध्ये या परिसरातील समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याने जमाव शांत झाला.

 

महादेव मंदिर परिसराची रात्रीच पाहणी केली असून, एकच रोहित्रावर लोड येत आहे. या रोहित्रावरील लोड कमी करून नवीन रोहित्रासाठी कर्जत विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्याठिकाणी असलेल्या तांत्रिक बिघाड आठ दिवसांत दुरुस्त करण्यात येईल.
योगेश कासलीवाल , उपअभियंता, महावितरण

महादेव मंदिर परिसरात गेल्या वर्षभरापासून कमी दाबाने वीजपुरवठा होतो, तर कधी रात्र-रात्र लाइट जाते. याबाबत वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले तरीही अधिकारी आमची दाखल घेत नाहीत.
जनाबाई जाधव , ज्येष्ठ महिला

गेल्या वर्षभरापासून आम्ही या परिसरात स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठी जागाही महावितरणला उपलब्ध करून दिली. तरीही अधिकाऱ्यांनी त्याची दाखल घेतली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तपनेश्‍वर भागाला वायरमन नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी काम करत नसल्याने आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

शिवाजी येवले नागरिक 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)