पुणे: पीवायसी चॅलेंजर करंडक 3 दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या दिवशी मुर्तझा ट्रंकवालाच्या (233 धावा) द्विशतकी खेळीसह आतिश वरपेच्या (102 धावा) शतकी खेळीच्या जोरावर एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावात पूना क्लब संघापुढे 509 धावांचा डोंगर उभा केला आहे. दुसऱ्या सामन्यात वैभव गोसावीने (23-5) केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघचा पहिला डाव 107 धावांवर संपुष्टात आला.
तीन दिवसीय लढतीत आज पहिल्या दिवशी एमसीए संयुक्त जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना 88 षटकांत 6 बाद 509 धावा केल्या. यात मुर्तझा ट्रंकवाला याने धडाकेबाज फलंदाजी करत 167 चेंडूत 20 चौकार व 16 षटकरांच्या मदतीने 233 धावा केल्या, तर आतिश वरपे याने 149 चेंडूत 13 चौकारांसह 102 धावा केल्या. एमसीए संयुक्त जिल्हा संघ व पूना क्लब यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.
क्लब ऑफ महाराष्ट्रच्या वैभव गोसावी (23-5), नितीन धुमाळ (49-3) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा पहिला डाव 36.3 षटकांत 107 धावांवर संपुष्टात आला. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज दिवसअखेर 37 षटकांत 6 बाद 85 धावा केल्या. डेक्कन जिमखाना व क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.