वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनविरोधातील कठोर भूमिका योग्यच होती, असे नूतन परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. अध्यक्ष बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणामध्येही चीनविरोधात कठोर भूमिकाच घेण्यात आली असल्याचा पुनरुच्चारही ब्लिंकन यांनी केला. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्लिंकन यांनी ट्रम्प यांच्या चीनविरोधातील कठोर भूमिकेबाबत भाष्य केले.
ट्रम्प यांनी ज्या प्रकारे कार्य केले, ते आपल्या मतानुसार चुकीचे होते. मात्र ट्रम्प यांचे मूळ तत्व बरोबरच होते, असे ब्लिंकन म्हणाले. अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी चीनविरोधात घेतलेली कठोर भूमिका योग्यच होती. हीच योग्य कृती होती. आता याच कठोर भूमिकेतून चीनबरोबर व्यवहार करावा लागणार आहे.
चीनबरोबरच्या विरोधी भूमिकेतून, स्पर्धात्मक भूमिकेतून किंवा सहकार्याच्या भूमिकेतूनही आपल्याला परस्पर सामंजस्यातून आपल्या हिताची भूमिका घ्यावी लागेल. आता समर्थपणेच ही भूमिका पार पाडावी लागेल. याचाच अर्थ समर्थ आघाडी असावी, असे ते म्हणाले. कारण जर आपण माघार घेतली, तर चीन पुढे येईल, असेही स्पष्टिकरण त्यांनी दिले.
ट्रम्प यांच्या कारकिर्दीत व्यापार, दक्षिण चीन समुद्रातील दावेदारी, तैवानला सतत भेडसावत असलेला धोका, शिझियांग प्रांतातील उईघ्युर मुस्लिमांवरील अत्याचार, करोना विषाणूचा फैलाव आणि तिबेट आदी मुद्दयांवरून अमेरिकेने चीनला सातत्याने विरोधाचीच भूमिका घेतली होती.