वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वतःचेच एक ट्विट डिलिट केले. वर्णभेदाला चिथावणी देणारे हे ट्विट असल्याच्या कारणावरून त्यांनी हे ट्विट डिलिट केले, असे बोलले जात आहे. रविवारी ट्रम्प यांच्या एका समर्थकाचा “व्हाईट पॉवर’ अशी घोषणा देणारा व्हिडीओ ट्रम्प यांनी ट्विटरवर शेअर केला होता.
“व्हाईट पॉवर’ अशी घोषणा श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादाचे जोरदार समर्थन करणारी घोषणा मानली जात आहे. याबाबत चर्चा सुरू होताच ट्रम्प यांच्याकडून आज हे ट्विट डिलिट केले गेले. हे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यामागील कारण विचारले असता, अध्यक्षांनी व्हिडीओमधील घोषणा ऐकलेली नव्हती, असे कारण सांगण्यात आले.
हा व्हिडीओ एका खेडेगावातील फ्लोरिडा रिटायर्ड कम्युनिटीचा होता. याच व्हिडीओमध्ये ट्रम्प समर्थक आणि विरोधकांमधील परस्परविरोधी निदर्शनेही दिसली आहेत. आपल्याला समर्थन देणाऱ्यांचे आभार मानून ट्रम्प यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला. त्यात गोल्फ कार्ट चालवणारा एक जण दिसतो आहे. त्या कार्टवर “व्हाईट पॉवर’ असे लिहिलेले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना उद्देशून “नाझी’, “रेसिस्ट’ अशी घोषणा देणारेही दिसत आहेत.
थोड्या वेळाने ट्रम्प यांनी हे ट्विट डिलिट केलेले दिसले. वर्णभेदाविरोधातील आंदोलन तीव्र झाले असताना “व्हाईट पॉवर’चे ट्विट घातक ठरू शकण्याच्या भीतीने ट्रम्प यांनी हे ट्विट डिलिट केले.