परिंचे (वार्ताहर) – माहूर (ता. पुरंदर) येथील सीआरपीएफमधील जवान आबा वसंत चव्हाण (वय 36) यांचा शुक्रवारी (दि 26) जम्मू येथे वाहनातून लष्करी तळावरील निवासस्थानाजवळ जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी ते माहूर येथून जम्मू येथे ड्युटीवर हजर राहण्यासाठी गेले होते.
आबा चव्हाण हे काही दिवसांपूर्वी माहूर येथे सुट्टीवर आले होते. गुरूवारी (दि.25) जम्मू येथे सेवेत रूजू होण्यासाठी पुणे येथून विमानाने गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर सीआरपीएफच्या वाहनातून ते लष्करी तळावरील निवासस्थानाकडे जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, एक चार वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.
सासवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, उपसरपंच सुशिल चव्हाण यांनी जवान आबा चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहुरकर, परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.