इंद्रायणीनगर – दुचाकीप्रेमींमध्ये सध्या बुलेटची “क्रेझ’ वाढली आहे. कर्णकर्कश हॉर्न व फटाक्याचे आवाज काढून सामान्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी बुलेट चालकांकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष विचलित होऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी, चन्होली, भोसरी, वाकड, चिखली परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. यातून येणाऱ्या पैशांतून महागड्या गाड्या, मोबाइल फोन व चैनीच्या वस्तू खरेदीवर जास्त भर दिला जात आहे. मिळालेल्या पैशांतून अशा वस्तू खरेदी करून मिरविण्याची हौस पूर्ण करण्यात येते. परंतु यांच्या दिखाव्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीही या बुलेटचालकांचा उपद्रव सुरू असतो.
विशेषतः महाविद्यालयांच्या परिसरात बुलेट भरधाव चालविल्या जातात. वाहनात बदल करावयाचे असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, कोणतीही परवानगी न घेता केवळ फॅशनसाठी या गाड्यांमध्ये बदल केला जातो.
बुलेटधारकांकडून सायलेन्सर आणि हातातील बटण सलग दाबून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. प्रामुख्याने दुसऱ्या चालकाचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी असे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे अचानकपणे कानावर पडलेल्या आवाजामुळे शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होते. या प्रकारांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.
बुलेट गाडी असताना चालू गाडी भरधाव वेगामध्ये बंद केल्यास गाडीच्या सायलेन्सरमधून आग आणि फटाक्याचा आवाज येतो. बुलेटचालक पोलिसांच्या समोरुन ट्रिपल सीट फिरतात. फॅशन आणि केझ जपण्यासाठी बुलेटस्वारांकडून आवाजासाठी खासपद्धतीने हॉर्नची रचना केली जाते. त्यासाठी स्टार्टर बटण आणि गाडीचे स्वीच सलग बंद चालू करत फटाक्यांसारखे आवाज काढले जात आहेत. वाहतूक पोलिसांनी या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
रुग्णांच्या जीवितास धोका
उपनगरांमध्ये चाळी आणि अनधिकृत सोसायट्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात अरुंद रस्त्याने बुलेटचालक मोठ्याने आवाज करत गाड्या चालवत असतात. त्या ध्वनीमुळे एखाद्या घरात असलेल्या आजारी माणसाला त्रास होतो. तसेच हृदयविकार, बीपीचे रुग्ण यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच लहान मुले झोपेत दचकत आहेत. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने नियमांचा भंग करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करावी.