सातारा – माण तालुक्यातील पाच तलाठी एकाच वेळी निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, महसूल विभागातील आणखी एक नवे प्रकरण उघडकीस आले आहे. पळशी (ता. माण) येथील तलाठी गुलाब उगलमोगले यांनी ते अपंग नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकऱ्यांनी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना चौकशी करायची सूचना दिली आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपात तथ्य आढळल्यास माण महसूल विभागातील आणखी एक तलाठी कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहे.
अधिक माहिती अशी, गुलाब वसंत उगलमोगले हे माण तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2009 साली महसूल विभागात भरती होताना कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र जोडून त्या आधारे नोकरी मिळवल्याची तक्रार संभाजी देशमुख (रा. मायणी, ता. खटाव) यांनी थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे फेब्रुवारीत केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ना. थोरात यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
सिंह यांनी हे प्रकरण खटाव-माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे पाठवून चौकशी अहवाल सादर करायचा आदेश दिला आहेत. उगलमोगले यांनी यापूर्वी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या अनेकदा तक्रारी झाल्या होत्या. तत्कालीन तहसीलदार बाई माने यांनी उगलमोगले यांना जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्याचा आदेश दिला होता. तो आदेश न जुमानता उगलमोगले यांनी अद्याप तपासणी करून घेतली नसल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे. उघलमोगले यांच्याविरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही, त्यांना लोकप्रतिनिधींची साथ आहे. त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देशमुख यांनी तक्रार अर्जात केला आहे.
उगलमोगले यांच्याविरोधात यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या असून, त्यातील एक तक्रार मी केली आहे. त्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. प्रशासनाने यावेळी उगलमोगले यांना पाठीशी घातल्यास न्यायालयात दाद मागणार आहे.
बाबासाहेब माने, माण तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस.
उगलमोगले यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीच्या चौकशीत कादपत्रांची पडताळणी केली जाईल. चौकशीअंती वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे.
शैलेश सूर्यवंशी,प्रांताधिकारी.