पणजी – महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) आणि तृणमूल कॉंग्रेसच्या युतीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे प्रथमच गोवा विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झालेल्या तृणमूलला त्या राज्यात मित्र मिळाला आहे.
मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली. गोव्यातील विधानसभेच्या सर्व 40 जागा लढवण्यास मगोप समर्थ आहे. पण, गोव्यातील राजकीय स्थितीचा विचार करून युतीचा निर्णय घेण्यात आला. गोव्यात सत्तारूढ भाजपविरोधात लाट असल्याचा दावाही त्यांनी केला. त्या राज्यातील निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मगोप आणि तृणमूल युतीमुळे निवडणूक आणखी चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
गोव्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर मगोप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (जीएफपी) पाठिंबा दिल्याने भाजपला सरकार स्थापन करणे शक्य झाले. आता ते दोन्ही पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. जीएफपीने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. आम आदमी पक्षही (आप) रिंगणात असल्याने गोव्यातील निवडणूक बहुरंगी ठरणार आहे.