आदिवासी विकास महामंडळात सव्वा कोटींचा अपहार

जुन्नर -आदिवासी विकास महामंडळातील आठ तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकांवर डिझेल इंजिन आणि गॅस शेगडी योजनेत अपहारप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच एक तत्कालीन व्यवस्थापक आणि वीजतंत्री यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

आदीवासी विकास महामंडळात 2004 ते 2009 या कालावधीत हा अपहार झाला होता. या प्रकरणी विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक वर्ग 1 (रा. नाशिकरोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. या अपहारप्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्यावरुन न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी समिती नेमण्यात आल्यानंतर हा अपहाराचा प्रकार उघड झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित योजनेत आदीवासी लाभार्थ्यांना द्यावयाचे डिझेल इंजिन आणि गॅस शेगडी वितरणाची कोणतीही कागदपत्रे मिळाल्याने या अपहाराचा प्रकार उघडकीस आला. या इंजिन व गॅस शेगडीची वाहतूक करुन देणारी नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था आणि तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक यांनी 215 डिझेल इंजिनांची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे 39 लाखांचा आणि तेलपंप फिटींगसाठीचे सुमारे सहा लाख असे सुमारे 44 लाखांच्या अपहार केला. तर 2009 ते 2010 या कालावधीत अनुसुचित जमातीतील दारिद्ररेषेखालील पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या 511 गॅस शेगड्यांची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे 78 लाखांचा अपहार झाला होता.

दरम्यान, या गुन्ह्यातील घोटाळ्याची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

यांच्यावर गुन्हा दाखल

व्ही. टी. जामनिक (नाशिक), बी. जी. घाटकर (पाथर्डी फाटा, नाशिक), एम. पी. धुर्वे (साकोली, भंडारा), एस. एन. मांदळे (नाशिक), एम. एस. बुळे (अकोले, अहमदनगर), जी. आर. सोनवणे (सारदे, नाशिक), यू. के. मेंगडे (मेंगडेवाडी, आंबेगाव), एस. एन. मून (पुलगाव, वर्धा) या आठ माजी प्रादेशिक व्यवस्थापकांसह तत्कालीन वीजतंत्री एस. एस. भारमल (जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

घोटाळेबाजांची झोप उडाली

आदिवासी योजनांमध्ये घोटाळा झाल्याची ओरड अनेकदा ऐकत असतो; परंतु प्रथमच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने या खात्यातील घोटाळेबाजांची झोप उडाली आहे. आदिवासी योजनांमधील इतर काही तक्रारी वा घोटाळ्याची माहिती असल्यास तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य वेळ असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.