तर 1 जुलैनंतर पाण्यासाठी वणवण

30 जूनला संपणार टॅंकरची मुदत : आदेशाची प्रतीक्षा
आजही 77 गावे, 307 वाड्यांना टॅंकरने पाणी

संगमनेर  – जूनच्या अखेरीसही पावसाची प्रतीक्षा कायम असून, या महिन्यात सरासरी 75 मिमी पावसाच्या तुलनेत अवघा 51 मिमी म्हणजे 24 मिमी तुटवडा आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्‍यात आजही 77 गावे आणि 307 वाड्यांना 76 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस पडून जलसाठे निर्माण होईपर्यंत ते कायम ठेवणे अपेक्षित असताना आता 30 जूनचा अडसर निर्माण झाला आहे. शासन दरबारी टॅंकरसाठी 30 जूनपर्यंत मुदत असून नियमानुसार 1 जुलैपासून टॅंकर बंद करावे लागतात अथवा मुदतवाढ घ्यावी लागते. शासनाकडून अद्याप कोणतीही मुदतवाढ प्राप्त न झाल्याने या 77 गावे आणि 307 वाड्यांची 1 जुलैनंतर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत 24 मिमी कमी पडलेल्या पावसामुळे तालुक्‍यातील लहान-मोठ्या बंधाऱ्यात जलसाठाही कमीच उपलब्ध झाला. यंदा अद्याप तालुक्‍यातून वाहणाऱ्या प्रवरा आणि मुळा नद्या कोरड्या असल्याने परिणामी दुष्काळात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या. तालुक्‍यामध्ये आजच्या स्थितीत 77 गावे आणि 307 वाड्यांची तहान भागविण्यासाठी 77 टॅंकरच्या सुरू आहेत. या टॅंकरच्या माध्यमातून रोज 207 फेऱ्या केल्या जात आहेत. काही ठिकाणी पाऊस पडला असला तरीही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प आहे. पावसाने हुलकावणी दिल्यास टॅंकर्सची मागणी वाढण्याची शक्‍यता असून पंचायत समिती प्रशासनही धास्तावले आहे.

साधारणत: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या-नाल्यांना पाणी येते. विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटत असल्याची शासनाची भावना आहे. त्यामुळे 30 जूननंतर कागदोपत्री टंचाई संपुष्टात येते. त्यामुळे तालुक्‍यातील सद्यस्थितीत सुरू असलेले 76 टॅंकर बंद होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत टॅंकरला मुदतवाढ मिळावी यासाठी पंचायत समिती प्रशासनाने प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर पुढील दोन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)