पिंपरी, दि. 18 – सत्तेसाठी केलेली गद्दारी महाराष्ट्रात सहन केली जात नाही. पश्चिम बंगालमध्ये 34 आमदार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सोडून गेले होते. मात्र त्यामधील केवळ 32 आमदार पुन्हा निवडून आल्याचा इतिहास सर्वांना माहित आहे. महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेलेले आमदार खासदार यांना जनता धडा शिकवेल, असा टोला माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची वर्णी लागली. या वेळी दै. प्रभातच्या प्रतिनिधींशी बोलताना माजी आमदार चाबुकस्वार बोलत होते.
चाबुकस्वार म्हणाले की, आगामी काळात जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करणार आहे. या बरोबरच नव्याने अनेक तरूण देखील पक्षात सहभागी होत आहेत. त्यांना देखील सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी आहे. यामध्ये अनेक घटक पक्ष देखील आहेत. त्यामुळे भविष्यात निवडणुकीचा कोणताही विचार न करता पक्ष संघटन बळकट करण्याकडे लक्ष देणार असल्याचे चाबुकस्वार म्हणाले.
दै. प्रभातच्या वृत्तावर शिक्कामोर्तब –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागेल असे सविस्तर वृत्त दै. प्रभातमध्ये 24 सप्टेंबर 2022 रोजी दिले होते. चाबुकस्वार यांची नुकतीच जिल्हाप्रमूखपदी निवड झाली आहे. त्या बाबतची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. प्रभातने दिलेल्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.